अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:
(सलीलचा आवाज) पद्य:
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.....
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना...
(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं
(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....