कागदाने ठरवायचं नसतं
त्याच्यावर काय लिहीलं जाईल..
कागदाने गप्पगुमान पडून
रहायचं इतर कागदांच्या संगतीनं..
वहीमध्ये आपल्या नशिबाची वाट पाहत..
लिहीणारा लिहीलच त्याच्यावर..
त्याचे नशिब..
एखादा प्रियकर लिहील
त्याच्यावर पहिल्या प्रेमाची तरल कविता..
कागदाने गुलाबी व्हायचं कारण नाही..
प्रेमामध्ये पडणारे प्रेमकविता करणारच
कागदाने मात्र ते मोरपिस आयुष्यभर सांभाळायचं
एखादा व्यापारी मांडेल त्याच्यावर..
अंकांचे रखरखीत हिशोब..
कागदाने हातचे जपायचं कारण नाही
व्यवहारात चढाओढी चालणारच
कागदाने मात्र त्याचं कर्ज आयुष्यभर जपायचं
एखादा चित्रकार चितारेल त्याच्यावर
खंगल्या शेतक-याचं झक्क पोर्टेट..
कागदाने ओलं व्हायचं कारण नाही
आजुबाजूचं जग कागदावर उतरणारच
कागदाने मात्र फ्रेम होऊन आयुष्यभर लटकायचं
सगळ्याच कागदांचं कुठे असतं इतकं चांगलं नशिब.
काही कागद नाही का सांभाळत..
निरपराध लोकांच्या फाशीचे निर्णय,
आप्तेष्टांच्या मृत्यूच्या वार्ता,
असाच एक कागद आज माझ्याही खिशात..
कामावरून कमी केल्याचा...!!!
No comments:
Post a Comment